ब्रिटिशांच्या राजवटीत स्वदेशीचा विचार करणारे देशभक्त-- ग.वा .जोशी
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत परकीय वस्तूंच्या होळ्या करून स्वदेशी वस्तू निर्मितीस प्रोत्साहन देणारे देशभक्त गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म २० जुलै १८२८ रोजी गणेश चतुर्थीला सातारा येथे झाला ,त्यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील पुण्यात आले आणि सरदार हरीपंत देशमुख यांच्याकडे नोकरी करू लागले, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने व सरदारांचे महत्त्व कमी झाल्याने त्यांनी नंतर इंग्रजांची नोकरी पत्करली. सेवानिवृत्तीनंतर त्यांना साडे सदतीस रुपये पेन्शन मिळू लागली , १८३० साली
वडिलांचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या पत्नीस म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांच्या मातोश्रीस निम्मी पेन्शन मिळू लागली .
गणेश जोशींचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले .मोडी लिहिणे ,वाचणे, बेरीज वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार ,तोंडी हिशोब एवढ्या शिक्षणावर सरकारी नोकरी मिळत असे. शिक्षण चालू असतानाच गणेश जोशी यांना कोर्टात नाझर म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी त्याच काळात इंग्रजी भाषा ही चांगली आत्मसात केली ,पण नोकरीत ते समाधानी नव्हते. तरीपण कोर्टातील कामामुळे त्यांना तेथील बरीच माहिती झालेली होती ,त्यामुळे त्यांनी घरीच अभ्यास करून सन १८६१ साली वकिलीची परीक्षा दिली. त्यावेळी १०४ जणांपैकी १९ जणांना सनद मिळाली त्यामुळे गणेश वासुदेव जोशी हे वकील म्हणून काम करू लागले. ते फौजदारी आणि दिवाणी असे खटले चालवू लागले त्यांनी समाजात नामांकित वकील म्हणून नाव कमावले.
प्रामाणिकपणे अनेक खटले चालवले ,एका खटल्या तर सन १८६८ साली फी बद्दल मिळालेल्या जागेत म्हणजेच सदाशिव पेठेतील बाजीराव रस्त्यावर काकांनी विष्णू मंदिराची उभारणी केली व जवळच एक हाऊद बांधला ते मंदिर नवा विष्णू मंदिर म्हणून दिमाखात उभे आहे. वासुदेव बळवंत फडके या क्रांतीकारकाची केसही कोणी घेत नसताना त्यांनी ती जिद्दीने लढवली ,पण त्यात त्यांना यश आले नसले तरी त्यांच्या निर्भीड स्वभावाची आणि देशभक्तीची साक्ष देणारी आहे.
पर्वती देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार झाल्याने तो उजेडात आणण्यासाठी त्यांनी पुणेकरांच्या वतीने वकीलपत्र स्वीकारले आणि रयतेची सर्वच गा-हाणी सरकार दरबारी मांडण्यासाठी व्यापक व्यासपीठ असावे यासाठी २ एप्रिल १८७० साली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली.
इंग्रजी राजवटीत लहान सहान तंटेही कोर्टात दाखल होत असत. त्यास न्यायही चोख मिळत असे ,पण तो फार खर्चिक व वेळ खाऊ व मनस्ताप देणार असे .त्याला पर्याय म्हणून सार्वजनिक काकांनी इंग्रज पूर्व न्यायदान पद्धतीकडे लक्ष घातले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .त्या काळात पंचायत न्याय सभासद पद्धत त्या त्या गावातले खटले चालवीत चालविले जात असत त्यात वकील देण्याची आवश्यकता नसते वादी प्रतिवादीच आपापली बाजू मांडीत.न्यायही तातडीने मिळे व खर्चही कमी होई. याचा फायदा सर्वांना झाला .
स्वदेशी व्यापारात इंग्रज राज्यकर्ते हिंदूस्थानातील संपत्तीचे शोषण करीत असल्याने त्यांच्याच वस्तू हिंदूस्थानात विकून जबरदस्त संपत्ती परदेशात नेत असल्याने त्यांच्यावर त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा लोकांपुढे आदर्श ठेवला व परकीय वस्तूंच्या होळ्या केल्या ,आपली संपत्ती देशातच राहील यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले .घरीच तयार होणाऱ्या छत्र्या ,धोत्रे ,पैठणी ,पागोटे ,छडीदार पायघोळ अंगरखा व खादी निर्मितीस प्रोत्साहन दिले. जातीभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता ,धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढपरंपरा ,स्त्री शिक्षण, सती प्रथा, अंधश्रद्धा यासाठी पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने त्यांनी खूप प्रयत्न केले.
१८७६ साली भयंकर दुष्काळ पडला होता, अन्नपाणी मिळेनासे झाले, गुरेढोरे विकली जात होती, त्यामुळे सगळीकडे हलकल्लोळ माजला होता, त्यांतच देवी,पटकी, रोगाने थैमान घातले होते,यांचा फायदा मिशनऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली 'अनाथ अर्भकालय ' काढून धर्मांतरास सुरुवात केली, त्यांची आश्रमात घेतांना मुळी अटच होती.तेथे येणारी मुले ख्रिश्चन बनविली जातील.या अन्यायाविरुद्ध व धर्मांतराच्या कारस्थानाविरुद्ध सार्वजनिक काकांनी दंड थोपटले.धर्मावर आलेला हा घाला परतवून टाकण्याचा निश्चय करून ते कामाला लागले,यावर मलमपट्टी म्हणून याकरिता सरकारने एक समिती नेमली, काकांनी जनतेच्या वतीने निर्भयपणे साक्ष देवून थेट इंग्लंड पर्यंत गा-हाणे नेले, राज्यकर्त्यांच्या कानी प्रजेचे दु:ख जावे , म्हणून विलायतेतील वर्तमानपत्रातून लेख प्रसिद्ध केले, द्रव्य निधी गोळा केला, दुष्काळ समित्या स्थापन केल्या, स्वस्त धान्यांची दुकाने जागोजागी उघडली. त्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली.
सार्वजनिक काकांच्या पत्नी सरस्वतीबाई आणि रावबहादूर सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या पत्नी यांच्या पुढाकाराने १८७३ मध्ये पुण्यात ''स्त्री विचारवंती ''या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली त्या संस्थेमध्ये जातिभेद दूर करण्यासाठी हळदीकुंकू सारखे उपक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात सर्व जाती धर्माच्या स्त्रिया सामील होत असत ,सदरची प्रथा आजही पुणे सार्वजनिक सर्भेत चालू आहे .
सार्वजनिक काकांचे बोलणे सत्य, सरळ आणि स्पष्ट होते .विवेक बुद्धीला जे पटले तेच भाष्य करीत, निराधार लोकांना मदत करणे ,अन्नदान करणे, विद्वानांचा सन्मान करणे ,विद्यार्थ्यांना मदत करणे, शेतकऱ्यांना मदत करणे ,यासारख्या अनेक कामांसाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले ,सार्वजनिक काकांचे कर्तुत्व इतरांवर छाप पडणारे होते ,ते उंच व शरीराने सडपातळ किंचित पोक असलेले काहीसा उभट चेहरा, अंगात अंगरखा ,धोतर आणि पगडी बेताच्या मिशा व विचारात घडलेली मुद्रा असायची.
औंध संस्थांचे राजे श्रीनिवास पंतप्रतिनिधी हे सार्वजनिक संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. सार्वजनिक काकांना लोकमान्य टिळक ,न्यायमूर्ती रानडे, सी.म. परांजपे, न.ची .केळकर ,कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ,कराड समाचाराचे रा.बा .फडके ,इदू मिलचे प्रकाश जनार्दन सुंदरजी ,सदाशिवराव गोंवडे, शिवराम साठे वगैरे बरोबर काम केले तसेच या संस्थेस महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद ,सुभाषचंद्र बॉस ,स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भेटी दिल्या, ब्रिटिश राजवटीमध्ये विविध प्रश्न समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न व कष्ट घेतले .अशा क्रांतिकारकाचे स्मरण व्हावे, यासाठी हा प्रपंच. !त्यांना जयंतीनिमित्ताने भावपूर्ण आदरांजली !
श्री. धनाजी का . चन्ने, पुणे
उपाध्यक्ष ,
पुणे सार्वजनिक सभा ,पुणे